वेब मास्टर म्हणजे काय ?

वेबमास्टर म्हटले की आपल्या  डोळ्यापुढे स्पायडरमॅनची प्रतिमा उभी राहते.  आपल्या जादूमय जाळ्याच्या मदतीने  अनेक करामती करताना  आपण सिनेमा व  कॉमिक्समध्ये पाहिलेले असते. मात्र  वेबमास्टर याचा अर्थ  असा स्टंटमॅन होत  नाही. मग वेबमास्टर  म्हणजे काय?

वेबमास्टर हा शब्द  जाळे विणणार्‍या  कोळ्यावरून आला आहे.  कोळी ज्याप्रमाणे आपल्या  पोटातील रसापासून सुंदर, नाजुक  पण ताकदवान धागा  तयार करतो व  त्यापासून नयन मनोहर,  एरवी अदृष्य पण  उन्हाच्या प्रकाशात इंद्रधनुष्याचे रंग  घेऊन चमकणारे जाळे  तयार करतो. हे  जाळे त्याने अनेक  ठिकाणी पानाफांद्यांना जोडलेले असते. अशा  जाळ्याच्या बाजूला राहून कोळी  आपल्या जाळ्यावर नजर ठेवून  असतो. जाळे तुटले  तर लगेच ते  परत दुरुस्त करतो.  अनवधानाने वा जाळ्याच्या  आभासी रंगांना भुलून  कीटक त्यात अडकले  की कोळी त्यांना  आपल्या धाग्यांनी जखडून टाकतो  व आपले भक्ष  बनवतो.

सध्याच्या संगणक विश्वात वेबसाईटची  तुलना अशा कोळ्याच्या  जाळ्याशी करता येईल.  ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेबसाईट  डिझाईन करून व  त्याचे व्यवस्थापन करणारा वेबमास्टर  म्हणजे सायबर विश्वातील कोळीच म्हणता येईल.कोळ्याच्या  जाळ्यात जसे एका मध्यवर्ती बिंदूस अनेक धागे जोडलेले  असतात. त्याप्रमाणे वेबसाईटमध्ये इंडेक्स पेजला इतर सर्व पाने जोडलेली असतात. धाग्याधाग्यांमध्ये  जसे बंध असतात तशा वेबसाईटच्या पानांमध्ये लिंक असतात. सहा पाय असलेला कोळी जाळे विणतो.  त्याप्रमाणे अनेक तंत्रशाखांचा ( HTML, CSS, Javascript, Photoshop, Flash, Multimedia  and other advanced techniques) उपयोग करून वेबसाईट डिझाईन करावी लागते.

वेबमास्टरकडे  अशा तंत्रशाखांचा वापर करण्याचे कसब असावे लागते. कोळी आपल्या पोटातील रसापासून धागा  बनवतो. त्याप्रमाणे वेबमास्टरला वेबसाईटवरील मजकूर (Content writing) तयार करावा लागतो.  वेबसाईटचे डिझाईन आकर्षक रंगसंगतीचे व लक्षवेधून घेणारे असावे लागते. युजरने वेबसाईटला  भेट दिली तर त्याला वेबसाईटवरच गुंतवून ठेवण्यासाठी वेबमास्टरला विशेष क्लृप्त्या लढवाव्या  लागतात व भेट देणार्‍यास आपल्या विक्रीयोग्य मालाचे वा सेवेचे ग्राहक बनण्यासाठी वा  त्याचे मत जाणून घेण्यासाठी प्रवृत्त करावे लागते.

एखाद्या संस्थेच्य़ा  वा उद्योग-व्यवसायाची वेबसाईट डिझाईन करण्यापूर्वी वेबमास्टरला वेबसाईटचे स्थूल स्वरूप  (Scope) निश्चित करावे लागते. संस्थेची सर्व माहिती (उदा.  नाव, स्थान, उद्देश, इतिहास, रचना, व्यवस्थापन व  विक्री वा सेवा वा इतर कार्य ) एकत्रित करून त्याची सुबक मांडणी करणे हे एक कौशल्याचे  काम असते. ही माहिती वेबपेजेसच्या स्वरुपात तयार करून अशी वेबपेजेस लिंक वापरून एकमेकांना  जॊडून अशी एकसंध वेबसाईट तयार करावी लागते की भेट देणार्‍यास त्याच्या इच्छेप्रमाणे  कोणतीही माहिती चटकन मिळू शकेल.

ही माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी त्यातील पानांचे वरचेवर  नूतनीकरण करावे लागते. संस्थेतील योग्य व्यक्ती वा विभागाकडून अशी माहिती ( मजकूर,  फोटो, ध्वनी वा व्हिडिओ क्लिप्स) संकलित करणे त्याचे संपादन करणे व प्रसिद्धीसाठी त्याची  आकर्षक मांडणी  करणे हे काम वेबमास्टरला करावे  लागते. एखादा मुद्दा नीट समजण्यासाठी काही चित्रे (Clip art) व सजावटीसाठी डिझाईन  (Graphic) यांचाही वापर करावा लागतो. मनोरंजनासाठी फ्लॅश वा HTML5 च्या साहाय्याने  पानातील मजकुरात जिवंतपणा (Animation) आणावा लागतो.

ग्राहकाच्या इच्छेनुसार  हवी ती माहिती गोळा करून वेबपेजचे डिझाईन सर्व्हरवरील प्रोग्रॅमद्वारे होत असेल तर  अशा वेबसाईटला डायनॅमिक वेबसाईट म्हटले जाते. अशा वेबसाईटसाठी स्वतंत्र डाटाबेस (MSSQL,  MySQL, Oracle ) आणि पीएचपी, डॉट नेट वा जावा   प्रोग्रॅम यांचा वापर करावा लागतो. याउलट स्टॅटिक वेबसाईटमध्ये डाटाबेस न वापरता  वेबपेजेस तयार करून त्यांचा संच सर्व्हरवर ठेवला जातो. ज्ञानदीपचा वेबमास्टर कोर्समध्ये  प्रामुख्याने स्टॅटिक वेबसाईट डिझाईनचा समावेश केला आहे.

अशी वेबसाईट तयार करणे  व त्याचे व्यवस्थापन करणे या गोष्टी वेबमास्टरच्या कार्यकक्षेत येतात. मात्र वेबसाईट  डिझाईन करण्यासाठी अनेक तंत्रशाखांतील कुशल तंत्रज्ञांची गरज लागत असल्याने बहुधा हे  काम बाहेरच्या वेबडिझाईन संस्थेमार्फत करून घेतले जाते व त्याचे नूतनीकरणाचे काम वेबमास्टरला  करावे लागते. वेबसाईट डिझाईन केली नसली तरी पानांत सुधारणा करण्यासाठी व नवी माहिती  घालण्यासाठी आवश्यक त्या सर्व तंत्रशाखांचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक असते.

ज्ञानदीपचा  वेबमास्टर कोर्सचा उद्देश असे प्राथमिक ज्ञान देणे हा आहे. हा कोर्स केवळ पैसे देऊन  वा परीक्षा पास होऊन मिळणार नाही तर त्यासाठी विद्यार्थ्याची हे ज्ञान आत्मसात करण्यासाठी  आवश्यक तेवढा वेळ खर्च करण्याची तयारी पाहिजे. या कोर्सच्या शेवटी परीक्षा असणार नाही  तर विद्यार्थ्याकडून एक वेबसाईट डिझाईन  प्रॉजेक्ट   पूर्ण करून घेतले जाईल. इंटरनेटवर  अशी तयार झालेली वेबसाईट प्रसिद्ध करण्यासाठी डोमेन  नेम कसे रजिस्टर करायचे, सर्व्हरवर ती कशी स्थापित करायची याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन  विद्यार्थ्यास देऊन त्याला वेबसाईटचे व्यवस्थापन व नूतनीकरण कसे करायचे हे शिकविले  जाईल.

वेबमास्टर कोर्स करण्यासाठी  कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची वा पदवीची पूर्व अट नाही. संगणक हाताळण्याची माहिती असणार्‍या  कोणत्याही  व्यक्तीस हा वेबमास्टर कोर्स पूर्ण  करता येईल. छोट्या संस्थांना आपली माहितीपूर्ण वेबसाईट करण्यासा्ठी व त्याचे व्यवस्थापन  करण्यासाठी आपल्या संस्थेतील होतकरू व्यक्तीस हा कोर्स करण्यास प्रायोजित केले तर आपली  वेबसाईट आपलीआपण करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होईल व इंटरनेट विश्वातील ग्राहकांना  आकर्षित करण्याचे सामर्थ्य संस्थेमध्ये य़ेईल. संस्थेतील व्यक्तीनेच वेबसाईट डिझाइन  केल्याने खर्चात बचत होईल शिवाय वेबसाईट व्यवस्थापनासाठी वा नूतनीकरणासाठी  दुसर्‍या संस्थेवर अवलंबून राहावे लागणार नाही.

या दृष्टीकोनातून विचार करता ज्ञानदीपची ही योजना  छोट्या संस्थांना व व्यवसायांना एक वरदानच ठरणार आहे

Original blog link

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

English
मराठी English